खुपीरे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पूर्वप्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पी. एम. श्री कुमार विद्यामंदिर, खुपीरे येथे इंग्रजी माध्यम प्री-प्रायमरी बालवाटिकेचे (अंगणवाडी) उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
सहा वर्षांखालील बालकांना इंग्रजी माध्यमातील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागू नये आणि आपल्या गावातच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने शाळेने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
उद्घाटन समारंभास करवीर पंचायत समिती सदस्या सौ. आशा प्रवीण पाटील, विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, ग्रामपंचायत डे. सरपंच सागर पाटील, केंद्रप्रमुख महेंद्र स्वामी, ग्रामसेवक पोवार, शाळेचे मुख्याध्यापक के. एस. पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात जाधव, उपाध्यक्ष सौ. कोमल नाईक, सदस्य युवराज पाटील, उदय पाटील, रेश्मा पाटील, शामल पाटील, संदीप पाटील, डॉ. आर. एच. पाटील, माजी डे. सरपंच युवराज पाटील तसेच बालवाटिका शिक्षिका सौ. आरती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील बालकांसाठी गावातच दर्जेदार इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.