Saturday, July 25, 2026
HomePoliticalNEET वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांना लिहिलं खुलं पत्र

NEET वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थ्यांना लिहिलं खुलं पत्र

नवी दिल्ली : NEET-UG परीक्षेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य राजकीय संघर्ष आणि कायदेशीर पेचप्रसंगात अडकू नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात स्पष्ट केलं आहे.

पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून NEET परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.

यावर्षी 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता होती. केंद्र सरकार, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे 21 जून रोजी परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं.

परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारली होती आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार केला होता, असं प्रधान यांनी पत्रात म्हटलं आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालात गरीब कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

मात्र, गेल्या काही दिवसांत काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत, त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं त्यांनी नमूद केलं. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रात त्यांनी देशातील आंदोलनांचाही उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य आंदोलन आणि न्यायालयीन प्रक्रियेत अडकू नये, त्यांनी शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं, अशी भावनिक साद त्यांनी विद्यार्थ्यांना घातली. तसेच राष्ट्रविरोधी शक्तींना सध्याच्या परिस्थितीचा फायदा होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“भारताची युवा शक्ती ही देशाची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत मी पंतप्रधानांकडे माझा राजीनामा सादर केला आहे,” असं पत्राच्या शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वास आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानत भविष्यातही राष्ट्रसेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, विरोधी पक्षांनी या राजीनाम्याचं स्वागत करत हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या विजयाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी झालेल्या आंदोलनामुळे सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular