Tuesday, August 4, 2026
HomeSocialपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील दैदिप्यमान...

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील दैदिप्यमान पर्व संपले

कोल्हापूर : माजी राज्यपाल, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ९१ व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत महाराष्ट्रासह देशभरात दर्जेदार शिक्षणसंस्थांचे जाळे उभारले. त्यांनी स्थापन केलेल्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले.

शिक्षण आणि समाजकार्यातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपाल म्हणून यशस्वीपणे कार्य केले. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबरोबरच शिक्षणविषयक दूरदृष्टीमुळे त्यांना देशभरात विशेष मान्यता मिळाली.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा ठसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा भावना विविध मान्यवरांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular