कोल्हापूर :राज्यातील शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार टाकणारी पाणीपट्टीची दुप्पट दरवाढ तत्काळ स्थगित करावी आणि या संदर्भात सर्व संबंधित घटकांची तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या दरवाढी विरोधात आवाज उठवला होता. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, कृषी, औद्योगिक क्षेत्र आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांसाठीची पाणीपट्टी वाढवणे तसेच शेतकऱ्यांच्या मोटर पंपांवर जलमापक (मीटर) बसवण्याची सक्ती करणे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत सर्व घटकांची व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, १ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पाणीपट्टीचे दर जवळपास दुप्पट करून ती वाढ १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आल्याचे समोर आले आहे. मे २०२६ मध्ये पार पडलेल्या सार्वजनिक सुनावणीत राज्यभरातून तीव्र विरोध झाला असतानाही शासनाने ही दरवाढ लागू केल्याने शेतकरी आणि उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अधिकारी, शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेशन, औद्योगिक संघटना, सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करावी. सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य निर्णय होईपर्यंत या दरवाढीच्या अंमलबजावणीला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.