Tuesday, August 4, 2026
HomeCrimeबेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्निल पाटील एजंटांसह जेरबंद; करवीर पोलिसांची...

बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्निल पाटील एजंटांसह जेरबंद; करवीर पोलिसांची मोठी कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य फरार आरोपी स्वप्निल केरबा पाटील याला त्याच्या दोन एजंटांसह अटक करण्यात करवीर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ९१, ३१९(२), ३(५) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम १९६१, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायदा १९९४ आणि वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना स्वप्निल पाटील हा कागल-मुरगूड मार्गावरील पिंपळगाव खुर्द येथे पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून स्वप्निल पाटील याला त्याचे एजंट संतोष ज्ञानदेव कोळी (रा. मडिलगे, ता. भुदरगड) आणि नंदकुमार भिमराव पाटील (वय ५९, रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) यांच्यासह ताब्यात घेतले.

आरोपींकडून सोनोस्कोप कंपनीचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यास न्यायालयाने ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोहेकॉ रणजित पाटील, विजय तळसकर, महेश बांबळे तसेच पोलीस कर्मचारी आत्माराम शिंदे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, अविनाश कांबळे, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे आणि प्रविण बोरचाटे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular