मुंबई, दि. १९:
कागल विधानसभा मतदारसंघात हायब्रिड अॅन्यूइटी (HAM) अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमधील दिरंगाई आणि दर्जाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री श्री. भोसलेही मंत्री श्री. मुश्रीफ भुमिकेशी सहमत झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, विधानसभा निवडणुकीपूर्वी हॅम- हायब्रिड अॅन्यूइटी योजनेतून या मतदारसंघातील ‘रणदिवेवाडी, कागल, नदीकिनारा, मुरगुड, सेनापती कापशी ते काळभैरी देवस्थान मार्गे गडहिंग्लज- ७१ किलोमीटर’ आणि बेलेवाडी हुबळगी, ऊत्तूर ते गडहिंग्लज- २४ किलोमीटर’ या रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाची दोन प्रमुख पॅकेज मंजूर करण्यात आली होती. मात्र, मुख्य कंत्राटदाराने ही कामे पुढे सबलेट म्हणजे पोट मक्तेदारांना दिल्याने आणि वेळेवर बिले न दिल्याने कामांच्या दर्जाबद्दल व वेळेबद्दल सातत्याने अनेक बैठका घेऊनही परिस्थितीत सुधारणा होत नव्हती. डिटेल इस्टिमेट करीत असताना त्यामध्ये अनेक कामे समाविष्ट करायची राहून गेली होती. याचाही नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या सगळ्याचा एकदाचा सविस्तर सोक्षमोक्ष लावण्यासाठी मुंबईत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीत प्रामुख्याने कसबा सांगाव गावातील रस्ता, मौजे सांगाव गावातील रस्ता, कागल शहरातील रस्ते, गटर्स आणि युटिलिटी शिफ्टिंगची कामे, कागल- मुरगुड रस्त्यावरील सिद्धनेर्ली नदी किनाऱ्यावर दूधगंगा नदीवरील नवीन पूल, मुरगूड शहरातील कामे व गटर्स, मुरगुड- सेनापती कापशी रस्त्यावर सरपिराजीराव तलावाजवळील एलिव्हेटेड पूल, आलाबाद- सेनापती कापशी दरम्यान चिकोत्रा नदीवरील नवीन पूल, सेनापती कापशी चौकातील रस्ते व सुशोभीकरण इत्यादी सर्व कामे तात्काळ इस्टिमेट करून प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचे ठरले. सर्व प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, MSIDC- महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता श्री. हांडे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, मुरगुडचे नगरसेवक विशाल सूर्यवंशी, सुनिल चौगुले, संदीप भारमल, नितीन कलकुटकी, कागल नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.

