कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत संस्था पात्र अपात्रतेवरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय दिले जात असल्याचा आरोप प्रवीणसिंह पाटील यांनी केला. शुक्रवारी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाच्या ४ जानेवारी २००० रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध संस्थेने सरासरी किमान 50 लिटर दूध प्रति दिन संकलित करणे आवश्यक आहे. तरच ती संस्था नोंदणीकृत होऊ शकते. गोकुळच्या उपविधीनुसार अशा नोंदणीकृत संस्थेने सलग ९० दिवस गोकुळला दूध पुरवठा केल्यानंतरच गोकुळचे सभासदत्व प्राप्त होते. पण माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार गोकुळला शून्य लिटर दूध पुरवठा करणाऱ्या तब्बल २०० हून अधिक संस्थांना सभासदत्व बहाल करण्यात आले आहे. प्रतिदिन दहा लिटर दूध संकलन असणाऱ्या १५० संस्था, 30 लिटरच्या आत दूध संकलन करणाऱ्या २८१ संस्था तसेच 30 ते 50 लिटरच्या दरम्यान दूध संकलन करणाऱ्या ३२८ संस्थांना नियमबाह्यरित्या सभासदत्व देण्यात आले आहे. शासन निर्णयाची पायमल्ली करत सभासदत्व देण्यात आल्यामुळे गोकुळला वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर अन्याय झाल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अनेक संस्थांची नोंदणी झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी त्यांना गोकुळचे सभासद करण्यात आले तर काही संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच गोकुळचे सभासद होण्याची लॉटरी लागली.
हा प्रकार म्हणजे मूल जन्माला येण्याआधीच त्याचा दहावीचा निकाल लागण्यासारखा आहे असा टोलाही पाटील यांनी लगावला.
गोकुळ दूध संघामध्ये गेल्या पाच वर्षात केवळ मतांसाठी वाढवलेल्या या संस्था म्हणजे दुभत्या गाईच्या कासेला लागलेली गोचीड आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादकांच्या घामावर गोकुळचे वैभव उभारले आहे. या वैभवाला नख लावण्याचा काही लोकांचा डाव आहे. गोकुळच्या दुधात भ्रष्टाचाराच्या मिठाचा खडा टाकून दूध नासवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही प्रवीणसिंह पाटील यांनी दिला.
गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवर अनेक हरकती नोंदवण्यात आले असून सहाय्यक निबंधकांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शासन निर्णय आणि गोकुळच्या उपविधीच्या आधारावर निर्णय घ्यावा अशी मागणीही पाटील यांनी केली.