कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील महे येथे घरातून चोरीस गेलेले ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अवघ्या २४ तासांत हस्तगत करून करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी बृध्दीराज हिंदुराव वाईंगडे (वय ३४, रा. महे, ता. करवीर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शकुंतला हिंदुराव वाईंगडे यांच्या महे येथील राहत्या घरातून १५ ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात ३० ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी बृध्दीराज वाईंगडे हा पाडळी खुर्द येथील नृसिंह तरुण मंडळ परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे ५ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश बांबळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस अंमलदार महेश बांबळे, रणजित पाटील, विजय तळसकर, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, प्रविण बोरचाटे आणि आत्माराम शिंदे यांच्या पथकाने सहभाग घेतला. करवीर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.