Saturday, September 5, 2026
HomeCrimeकरवीर पोलिसांकडून १७२ आरोपींची ओळखपरेड

करवीर पोलिसांकडून १७२ आरोपींची ओळखपरेड

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सव २०२६ शांततामय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा आणि या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर करवीर उपविभागातील मागील पाच वर्षांत गणेशोत्सव काळात विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींची करवीर पोलीस ठाण्यात ओळखपरेड घेण्यात आली. या कारवाईत एकूण १७२ आरोपी हजर होते.

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल  यांच्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीत गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली आहे.

करवीर उपविभागातील करवीर, गांधीनगर, कागल, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, मुरगूड आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संबंधित आरोपींची माहिती घेऊन त्यांची करवीर पोलीस ठाण्यात ओळखपरेड घेण्यात आली.

या ओळखपरेडमध्ये करवीर पोलीस ठाणे ६०, शिरोली एमआयडीसी ५१, मुरगूड १८, कागल १३, गांधीनगर १२ आणि इस्पुर्ली ६, असे एकूण १७२ आरोपी हजर होते.

यावेळी करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांनी संबंधित आरोपींची ओळख पडताळून आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोणतेही अनुचित कृत्य करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या. सार्वजनिक शांततेचा भंग होईल, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नये, असे बजावण्यात आले.

तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह, वादग्रस्त अथवा अफवा पसरविणाऱ्या पोस्ट, संदेश किंवा वक्तव्यांचा प्रसार करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर परिस्थितीनुसार प्रतिबंधात्मक तसेच कठोर कारवाई करण्यात येईल आणि प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला.

गणेशोत्सव २०२६ शांततेत पार पडावा यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कारवाईवेळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गोकुळ शिरगावचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, इस्पुर्लीचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, मुरगूडच्या सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांतील प्रतिबंधक कारवाई करणारे अधिकारी व गोपनीय अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular