पन्हाळा प्रतिनिधी : शहाबाज मुजावर
आर.आर. खडके अकॅडमी, बोरपाडळे येथील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या सूर्यप्रतापसिंह उर्फ राणा संग्रामसिंह भोसले याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. शोटोकान कराटे-डू असोसिएशनच्या वतीने आयोजित १२ व्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये त्याने विविध प्रतिस्पर्ध्यांना तगडी लढत देत आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली.
लहान वयातच राज्यस्तरावरील स्पर्धेत पदक मिळविण्याची कामगिरी ही सूर्यप्रतापसिंहच्या मेहनत, जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाचे फलित मानली जात आहे. कराटेतील तंत्र, वेग, चपळाई आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
दरम्यान, या स्पर्धेत आर.आर. खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकूण दोन रौप्यपदके आणि तीन कांस्यपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर केलेल्या या दमदार कामगिरीमुळे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सूर्यप्रतापसिंहच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक तसेच मित्रपरिवाराने अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांमध्येही त्याने अशीच यशस्वी कामगिरी करावी, यासाठी शुभेच्छा दिल्या.