कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’वर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार बांधणी सुरू केली आहे. भाजपने थेट मुख्यमंत्र्यांपासून जोडण्या लावल्या आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन शिवसेना गटांनीही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र, गोकुळवर अखेर कोण बाजी मारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
गोकुळच्या राजकारणात पात्रता प्रक्रिया सुरू असतानाच सुमारे चौदाशे दूध संस्थांनी ‘अदृश्य शक्ती’सोबत जाणार नसल्याचा इशारा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणातील ही ‘अदृश्य शक्ती’ नेमकी कोण, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा ‘गुलदस्ता’ टाकला आहे. राज्यात महायुतीत आम्हीच आहोत; मात्र कोल्हापुरात गोकुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘मोठा भाऊ’ असेल, असे वक्तव्य मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील गोकुळच्या राजकारणाला आणखी उधाण आले आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या राजकारणाची पातळी राज्याच्या राजकारणापर्यंत नेली आहे. आता गोकुळवर कोणाची सत्ता असावी, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहकारमहर्षी आनंदराव पाटील (चुयेकर) यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची स्थापना केली. गावोगावी फिरून, सायकलवरून तसेच पायी जाऊन दूध संकलित करत त्यांनी गोकुळची मुहूर्तमेढ रोवली. त्याच गोकुळने आज महाराष्ट्राच्या राजकारणाला भुरळ घातली आहे. अगदी मुख्यमंत्र्यांनाही गोकुळच्या राजकारणाची दखल घ्यावी लागत आहे.
गोकुळवर कोणाचे सत्ताकारण असावे, याचे उत्तर सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला चांगलेच माहीत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आमदार सतेज पाटील यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्याविरोधात मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढण्याची भूमिका घेतली आहे.
सतेज पाटील सध्या एकटे असले, तरी त्यांची राजकीय ताकद आणि गोकुळमधील प्रभाव पाहता ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आघाडीला पुरून उरणार, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे आगामी काळात गोकुळच्या सत्तासंघर्षात कोणत्या राजकीय समीकरणांना बळ मिळते, कोणत्या गटाला दूध संस्थांचा पाठिंबा मिळतो आणि पडद्यामागची ‘अदृश्य शक्ती’ कोणती भूमिका बजावते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.