पन्हाळा प्रतिनिधी : शहानवाज मुजावर
पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथे डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत पिक पाहणीची नोंद करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कोतवालाच्या डोक्यात हेल्मेट मारून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
कोतवाल कृष्णात बाबुराव पाटील (वय ३८) हे तहसीलदारांच्या आदेशानुसार गेल्या महिनाभरापासून डिजिटल क्रॉप सर्व्हेचे काम करीत आहेत. बुधवारी तलाठी विद्या देशमुख यांच्यासोबत कार्यालयीन कामकाज सुरू असताना पिक पाहणीच्या नोंदीसंदर्भात त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.
कोतोली गावातील शेतातील ओढ्याची नोंद पिक पाहणीमध्ये करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या सॉफ्टवेअरमध्ये ‘ओढा’ असा पर्याय उपलब्ध नसून केवळ विहीर किंवा बोअरवेल यांची नोंद करण्याचे पर्याय असल्याचे तलाठी व कोतवाल यांनी सांगितले. तसेच संबंधित नोंदणीसाठी रोहित पानकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
यावरून धोंडीराम पाटील यांनी कोतवाल कृष्णात पाटील यांची शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात कृष्णात पाटील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
घटनेनंतर कृष्णात पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.