Thursday, November 19, 2026
HomeAgricultureगोकुळकडून दूध खरेदी दरात वाढ;म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये,गाय दूध...

गोकुळकडून दूध खरेदी दरात वाढ;म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये,गाय दूध दरात 2 रुपयांनी वाढ.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देतानाच ग्राहकांना महागाईचा मोठा झटका दिला आहे. म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर म्हैस दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गाय दूध विक्री दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही नवी दरवाढ २१ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहे.

गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे म्हैस दूध खरेदी दरात करण्यात आलेली प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ ही गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक दरवाढ मानली जात आहे.

नवीन दरानुसार, ६.० फॅट व ९.० एसएनएफ गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५ रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर ३७ रुपयांवरून ३९ रुपये होणार आहे. या निर्णयामुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे १४ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

दुसरीकडे ग्राहकांच्या खिशालाही मोठी झळ बसणार आहे. कोल्हापूरमध्ये म्हशीचे दूध प्रतिलिटर ७२ रुपयांवरून ७८ रुपये, तर मुंबई आणि पुणे येथे ७८ रुपयांवरून ८४ रुपये होणार आहे. गाय दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरसह मुंबई, पुणे आणि कोकणातील ग्राहकांना आता दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

७० कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढ

गोकुळ संघाला सुमारे ७० कोटी रुपयांची तूट झाली असून, ही तूट भरून काढण्याबरोबरच इंधन, पॅकिंग साहित्य, कच्चा माल आणि व्यवस्थापकीय खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन दूध विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात दूध उत्पादकांसाठी खरेदी दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत विक्री दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जानेवारीत पुन्हा दरवाढीचे संकेत?

दरम्यान, नोव्हेंबरमधील या मोठ्या दरवाढीनंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा दूध दरांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील दूध उपलब्धता, संकलन, बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती यांचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दुधाच्या पुरवठ्यात घट झाल्यास किंवा बाजारातील परिस्थिती बदलल्यास जानेवारीत पुन्हा दरवाढीचा विचार होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना आगामी काळात आणखी महागाईला सामोरे जावे लागणार का, याकडे लक्ष लागले आहे.

दरवाढीमागे दूध उत्पादकांचे हित प्राधान्याने

गोकुळशी संलग्न सुमारे ८ हजार २०० प्राथमिक दूध संस्था असून, सध्या दररोज सरासरी १७ ते १८ लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवाढ करण्यात आल्याचे संचालक मंडळाने म्हटले आहे. बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या किमती, इंधन दर आणि वाढती महागाई यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीला संचालकांची उपस्थिती

या बैठकीला गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, वीरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह दि. पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ. पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  • म्हैस दूध खरेदी दर : ५५ वरून ५८ रुपये.

  • गाय दूध खरेदी दर : ३७ वरून ३९ रुपये.

  • म्हैस दूध विक्री दरात : ६ रुपयांची वाढ.

  • गाय दूध विक्री दरात : ४ रुपयांची वाढ.

  • दूध उत्पादकांना महिन्याला १४ कोटींचा अतिरिक्त लाभ.

  • २१ नोव्हेंबर २०२६ पासून नवे दर लागू.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular