खोतवाडी, ता. पन्हाळा : युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करून सक्षम आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश देण्यासाठी खोतवाडी येथे ‘नेबरहूड युथ पार्लमेंट’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. माय भारत आणि ज्ञानज्योती फाउंडेशन संचलित सावित्रीबाई फुले वाचनालय, खोतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रमदान शिबिराच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘नशामुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात अमित हुजरे यांनी माय भारतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध युवा उपक्रमांची माहिती दिली. डॉ. निलेश पाटील यांनी व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. तर जयदीप अतिग्रे यांनी युवकांनी महाविद्यालयीन जीवनात व्यसनांपासून दूर राहून योग्य संगत, सकारात्मक विचार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच नशामुक्तीविषयक घोषणा आणि सकारात्मक विचार स्लोगन बॉक्समध्ये जमा करून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प व्यक्त केला.
माय भारतच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, क्रीडा, आरोग्य, स्वच्छता आणि जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उपक्रम राबविले जातात. ‘नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला अमृतराज रणदिवे, भैरवनाथ रणदिवे, अभिजित रणदिवे यांच्यासह सावित्रीबाई फुले वाचनालयातील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी माय भारतचे युवा अधिकारी स्वप्नील देशमुख आणि कार्यक्रम सहाय्यक गणेश भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

