Sunday, November 29, 2026
HomeHealth & Fitnessकोल्हापुरात अत्याधुनिक TAVI हृदय उपचार प्रक्रिया यशस्वी; ६८ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवदान!...

कोल्हापुरात अत्याधुनिक TAVI हृदय उपचार प्रक्रिया यशस्वी; ६८ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवदान! हृदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ. विदूर कर्णिक यांच्या टीमची यशस्वी कामगिरी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण यशाची नोंद झाली आहे. राजारामपुरी येथील हृदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विदूर कर्णिक आणि त्यांच्या अनुभवी टीमने अत्याधुनिक ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (TAVI) ही हृदय उपचार प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे गंभीर हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ६८ वर्षीय ज्येष्ठ रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित रुग्णाला एऑर्टिक स्टेनोसिस या गंभीर हृदयविकाराचा त्रास होता. या आजारामध्ये हृदयातून संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य झडपेमध्ये अरुंदता निर्माण होते. त्यामुळे रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होऊन रुग्णाच्या जीविताला धोका संभवतो. रुग्णाचे वय आणि शस्त्रक्रियेतील संभाव्य जोखीम लक्षात घेऊन पारंपरिक मोठ्या शस्त्रक्रियेऐवजी कमीत कमी चिरफाड करून केली जाणारी अत्याधुनिक TAVI प्रक्रिया निवडण्यात आली. डॉ. विदूर कर्णिक आणि त्यांच्या टीमने ही प्रक्रिया अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने यशस्वी केली.

विशेष म्हणजे, या महागड्या आणि अत्याधुनिक उपचार प्रक्रियेचा संपूर्ण खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कॉर्पस फंडाच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे रुग्णाला ही उपचार सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध झाली. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या यशाबद्दल हृदम हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. सायली कर्णिक यांनी आनंद व्यक्त केला. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य आणि अद्ययावत उपचार पद्धतींच्या माध्यमातून कोल्हापूरसह आसपासच्या परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या हृदयविकार उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपचार प्रक्रियेसाठी कॉर्पस फंडाची मंजुरी मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, डॉ. मिलिंद कदम, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे आणि डॉ. चेतन खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोल्हापूरमध्येच अत्याधुनिक हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध होत असल्याने गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. हृदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने केलेली ही यशस्वी कामगिरी कोल्हापूरच्या आरोग्यसेवा क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular