मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. राज्यातील थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे.
सरकारकडून ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यासोबतच जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात, अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा देखील सरकारने केली आहे. बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. विरोधकांकडून यासाठी सातत्याने मागणी होत होती. नागपुरात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. त्यानंतर सरकारने कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि अखेर अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या घोषणा :
-
पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियान सुरू करण्यात येणार
-
महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार
-
शेती व पशुपालन क्षेत्राला चालना देण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखले जाणार

