कोल्हापूर : काँग्रेसने शेवटच्या क्षणी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दाखल केलेले दोन्ही अर्ज मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अखेरपर्यंत भाजप नेत्यांसोबत समन्वय साधत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने सुरुवातीला अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार अध्यक्षपदासाठी शिंगणापूर गटातील सदस्य रसिका पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी असळज गटातील संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बिनविरोध निवडीसाठी विनंती झाल्यास अर्ज मागे घेण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रवादीचे संग्रामसिंह कुपेकर यांनी सभागृहात काँग्रेसला औपचारिक विनंती केली. “कोल्हापूर ही छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची भूमी आहे. पुढील पाच वर्षे एकत्रितपणे विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करूया,” असे आवाहन करत त्यांनी महाविकास आघाडीचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली.
या आवाहनानंतर आमदार सतेज पाटील यांच्या गटाने ‘मैत्री धर्म’ पाळत काँग्रेस उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत यांची निवड बिनविरोध निश्चित झाली.
दरम्यान, उपाध्यक्षपदाबाबतही उत्सुकता कायम होती. पाटील आणि महाडिक गटातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तानाजी पाटील यांच्या निवडीबाबत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर महाविकास आघाडीच्या सदस्यांना पुढील काळात आदर व विकासनिधीमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही, या अपेक्षेसह उपाध्यक्षपदाची निवडही बिनविरोध करण्यात आली.
एकूणच, राजकीय समन्वय आणि तडजोडीच्या भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड बिनविरोध पार पडली असून, पुढील पाच वर्षांच्या कारभाराकडे आता लक्ष लागले आहे.