चंदगड : तालुक्यातील अडकूर येथे सव्वा वर्षाच्या बालकावर कोल्ह्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात बालकाच्या चेहऱ्यावर, नाकाजवळ व डोळ्याखाली जखमा झाल्या असून वडिलांनी धाडसाने प्रतिकार केल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रवीण अरुण चव्हाण (वय १४ महिने, मूळ गाव भूतातांडा, जि. विजापूर, कर्नाटक) असे जखमी बालकाचे नाव आहे. चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील अडकूर परिसरात विजापूर जिल्ह्यातील बंजारा समाजातील मजूर कुटुंबे झोपड्या बांधून वास्तव्यास आहेत.
रविवारी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर रात्री साडेआठपर्यंत सर्वजण झोपडीबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यानंतर जेवण आटोपून प्रत्येकजण आपल्या झोपडीत गेला. दरम्यान, अरुण चव्हाण हे आपल्या मुलाला घेऊन झोपडीबाहेर चटई टाकून पहुडले होते.
सुमारे नऊच्या सुमारास अचानक एका कोल्ह्याने बालकाच्या चेहऱ्यावर झडप घालत जोरदार हल्ला केला. कुत्र्यासारखा प्राणी दिसताच अरुण चव्हाण यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्याला हटकले. बाजूलाच असलेल्या काठीने त्यांनी त्या प्राण्यावर प्रहार केला. त्यामुळे कोल्ह्याने तिथून पळ काढला.
या हल्ल्यानंतर बालक जोरात रडू लागले. त्याचा आवाज ऐकून आसपासच्या झोपड्यांतील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. जखमी बालकाला तत्काळ उपचारासाठी हलवण्यात आले.
या प्रकारामुळे अडकूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.