पन्हाळा प्रतिनिधी:
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पन्हाळगडावरील कुमार विद्यामंदिर व कन्या विद्या मंदिर येथे इयत्ता पहिलीमध्ये चिमुकल्यांचा प्रवेश उत्साहात पार पडला. फुलांचा वर्षाव, फेटे बांधून व खाऊ वाटप करत या नव्या विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पेन्सिल व वही भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात खास करण्यात आली.
‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’ या उपक्रमाला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिक्षक सरदार गायकवाड व मुख्याध्यापिका रचना चिले यांनी पालकांचे स्वागत केले.
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नवाज मुजावर यांनी शाळेच्या सुविधा सांगताना नमूद केले की, शाळेत सीसीटीव्ही, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज व मध्यान्ह भोजन यांसारख्या सोयी उपलब्ध आहेत. तसेच अनुभवी शिक्षकांमार्फत खेळातून शिक्षण, इंग्रजी अध्यापन व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते. यावर्षी प्रज्ञाशोध परीक्षेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
माजी अध्यक्षा सौ. सुनीता उदाळे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मातृभाषेत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजी माध्यमाच्या दिखाव्यापेक्षा मराठी शाळेत शिक्षण घेतल्यास मुलांची आकलन क्षमता व व्यक्तिमत्त्व अधिक चांगले विकसित होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इयत्ता पहिलीतील साडेसहा वर्षांचा हर्ष नगारजी याने छत्रपती शिवाजी महाराजांवरील गारद सादर करून उपस्थितांना भारावून टाकले.
कार्यक्रमास पालक, स्थानिक नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.