Kolhapur : शहरातील पाणीपुरवठ्यावरून आज मोठा वाद उफाळून आला आहे. सुमारे ७० कोटी रुपयांच्या थकीत पाणी बिलाच्या वसुलीसाठी जलसंपदा विभागाने थेट शहराचा पाणीपुरवठा बंद केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. या कारवाईला प्रत्युत्तर देताना महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे कार्यालयच सील केले.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा आणि नागदेवाडी येथील उपसा केंद्रांद्वारे Panchganga River मधून पाणी उचलले जाते. मात्र, २०११ पासून महानगरपालिकेकडून जलसिंचन विभागाचे पाणी बिल थकित आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मूळ बिल सुमारे ६६ कोटी असून त्यावर सुमारे ४ कोटी रुपयांचा सेस आकारण्यात आला आहे.
राज्यात आर्थिक वर्षाच्या अखेरीस वसुली मोहीम सुरू असताना जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी थकीत वसुलीसाठी कडक निर्देश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जलसिंचन विभागाने नागदेवाडी येथील उपसा केंद्र बंद करून शहराचा पाणीपुरवठा खंडित केला.
दरम्यान, या निर्णयामुळे संतापलेल्या महानगरपालिकेने जलसंपदा विभागावरच कारवाई करत संबंधित कार्यालय सील केले. यापूर्वी झालेल्या बैठकीत महानगरपालिकेला तत्काळ १० कोटी रुपये भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र ती रक्कमही अद्याप भरली नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी महापौरांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांमध्ये बैठक होणार असून, या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरवासीयांचे लक्ष आता या बैठकीकडे लागले आहे.