पुणे : भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
खरात याच्यासोबत चाकणकर यांचे संबंध असल्याचे आरोप आधीपासून होत होते. त्यातच खरातची पाद्यपूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पदावर असलेल्या व्यक्तीचे असे फोटो समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
दिवसभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाकणकर यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणात अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे. उध्दवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर यांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करावी, तसेच आरोपी अशोक खरातसोबत समोरासमोर बसवून नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. या प्रकरणात गंभीर आरोप करत सप्टेंबर ते जानेवारीदरम्यान त्यांच्या हातावर जखम असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
याचबरोबर, लक्ष्मण हाके यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांचा तत्काळ राजीनामा न घेतल्यास त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीवर फसवणुकीचा आरोपही त्यांनी केला.
या सर्व घडामोडींमुळे खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी मर्यादेत न राहता राज्याच्या राजकारणात मोठा मुद्दा बनला असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.