Thursday, April 30, 2026
HomePoliticalशक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून लावू ;खुपीरेतील सभेत शेतकऱ्यांचा निर्धार

शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हाकलून लावू ;खुपीरेतील सभेत शेतकऱ्यांचा निर्धार

दोनवडे:

करवीर तालुक्यातील खुपिरे येथे प्रस्तावित शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात खुपिरेसह ,साबळेवाडी ,शिंदेवाडी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेळाव्यात वक्त्यांनी शक्तीपीठ मार्गामुळे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम, जमिनीचे अधिग्रहण आणि पर्यावरणीय हानी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा जाहीर करावा, शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा आणि पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील यांनी सरकारवर टीका करत, “शक्तीपीठ प्रकल्पाच्या विरोधात आम्ही ठाम आहोत. शेतकऱ्यांनी गावागावात बैठका घेऊन मोठ्या संख्येने एकत्र यावे,” असे आवाहन केले.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुंडलिक केंबळेकर यांनी अधिकाऱ्यांच्या मोजणी प्रक्रियेविरोधात आक्रमक भूमिका घेत, “सरकारी जमिनीची मोजणी करण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावातून हाकलून लावा,” असे आवाहन केले.

सामाजिक कार्यकर्ते बबलू पाटील यांनी, “माझी जमीन जात नसली तरी मी शेतकऱ्यांच्या लढ्यात सहभागी होणार,” असे सांगत एकजुटीचा संदेश दिला.

सांगवडे येथील प्रकाश पाटील यांनी प्रकल्पाच्या व्यापक परिणामांकडे लक्ष वेधत सांगितले की, हा मार्ग सुमारे ८५६.७६ किलोमीटर लांबीचा असून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील अनेक गावांवर त्याचा परिणाम होणार आहे. “वेळीच विरोध केला नाही तर पुढील पिढ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीला 
हिंदुराव पाटील,  नितीन भोसले, निवास पाटील, बाजीराव सुर्वे, अक्षय भोसले, कुंडलिक केंबळेकर रघुनाथ पाटील, अर्जुन पाटील, , युवराज पाटील, निवास पाटील,प्रकाश पाटील, बंडा पाटील,सदाशिव पाटील,संभाजी पाटील  आदी शेतकरी उपस्थित होते.

मेळाव्याच्या शेवटी प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांशी चर्चा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निषेध मेळाव्यामुळे शक्तीपीठ मार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular