कोल्हापूर, दि. 26 : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) संचालक मंडळाच्या सन 2026 ते 2031 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सभासद प्रतिनिधी ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर ठराव दाखल करू नयेत, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर कृष्णा ठाकरे यांनी केले आहे.
मा. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभाग, पुणे यांनी मंजूर केलेल्या कार्यक्रमानुसार 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत शासकीय व सार्वजनिक सुट्ट्या वगळून ठराव स्वीकारण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधींनी 25 जून रोजी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह एकाचवेळी मोठ्या संख्येने सभासद प्रतिनिधी ठराव दाखल करण्यासाठी उपस्थिती लावल्याने कार्यालयीन कर्मचारी व यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. यावेळी गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन कर्मचाऱ्यांशी वादावादीचे प्रसंगही घडल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही समूहाने एकत्रितपणे ठराव दाखल करू नयेत, अशी तोंडी विनंती करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर, वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाकडून 29 व 30 जून रोजी शक्तिप्रदर्शनासह ठराव दाखल करण्याचे नियोजन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित पक्षांच्या प्रतिनिधींना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी व शासकीय यंत्रणा लक्षात घेता, शक्तिप्रदर्शनावेळी प्रतीकात्मक स्वरूपात जास्तीत जास्त 500 सभासद प्रतिनिधी ठराव एकावेळी जमा करावेत. त्यानंतर उर्वरित ठराव कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने दाखल करण्याचे नियोजन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
यामुळे सभासदांची गैरसोय, गोंधळ तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. शिवाय ठराव स्वीकारणाऱ्या शासकीय यंत्रणेवरील ताणही कमी होईल, असे आवाहन कृष्णा ठाकरे यांनी केले आहे.