Thursday, June 25, 2026
HomePoliticalदरवर्षी नव्याने निर्माण होणाऱ्या १२,८२४ एमबीबीएस डॉक्टरांमुळे यापुढे बोगस डॉक्टर वाढणार नाहीत,मंत्री...

दरवर्षी नव्याने निर्माण होणाऱ्या १२,८२४ एमबीबीएस डॉक्टरांमुळे यापुढे बोगस डॉक्टर वाढणार नाहीत,मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

मुंबई, दि. 26:
राज्यात सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी १२,८२४ नवीन एम. बी. बी. एस. डॉक्टर्स निर्माण होत आहेत. त्यामुळे, यापुढे बोगस डॉक्टर्स वाढणार नाहीत, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्री श्री. मुश्रीफ पावसाळी अधिवेशनात सभागृहामध्ये बोगस डॉक्टर्सविषयी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना ही माहिती देत होते. या उत्तरात श्री. मुश्रीफ यांनी बोगस डॉक्टरांची संज्ञा, शिक्षेच्या तरतुदी, जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या, डॉक्टरांची सत्यता ओळखण्यासाठी ‘नो युवर डॉक्टर’ उपक्रम, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नवीन एम. बी. बी. एस. डॉक्टरांची संख्या अशा विविध विषयांवर माहिती दिली.

मंत्री श्री मुश्रीफ यांनी उत्तरात दिलेली मुद्देनिहाय माहिती अशी…..

*बोगस डॉक्टरची संज्ञा…..!*
एम. बी. बी. एस., एम. डी., महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आयुर्वेदिक, युनानी, बी. ए. एम. एस., बी. एच. एम. एस., डेंटल या क्षेत्रातील नोंदणी न केलेले डॉक्टर्स “बोगस डॉक्टर” या संज्ञेत मोडतात. २०१५ ते २०२६ या कालावधीत एकूण ८९ बोगस डॉक्टर्सवर गुन्हे दाखल झालेले आहेत.

*कडक शिक्षेची तरतूद…..!*
नॅशनल मेडिकल कमिशनने अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांसाठी विविध शिक्षेच्या शिफारशी केल्या आहेस. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला एक वर्षापर्यंत कैद किंवा रू. ५० लाखापर्यंत दंड, महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अधिनियम ३३ अन्वये दोन वर्षे कैद किंवा दहा हजार रुपये दंड, नंतरच्या गुन्ह्यासाठी दहा वर्षापर्यंतची कैद अशा शिक्षा सुचविण्यात आल्या आहेत.

*जिल्हा व तालुका स्तरावर समित्या…..!*
बोगस डॉक्टरांच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारच्यावतीने दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने एक अहवाल दिला आहे की, जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली
समिती सदस्यांची नेमणूक केलेली आहे. या समितीने सातत्याने पाठपुरावा करून बोगस डॉक्टरांच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करायचे आहेत.

*नो युवर डॉक्टर……!*
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, नोंदणीकृत डॉक्टरांची सत्यता पडताळण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून क्यू. आर. कोडवर आधारित प्रणाली राबविण्यात येत आहे. क्यू. आर. कोड स्कॅन होताच डॉक्टर म्हणून नोंदणीकृत आहे की नाही, हे समजेल.

दरवर्षी नवीन १२,८२४ डॉक्टर्स…..!
राज्यात आता एक लाख चाळीस हजार नोंदणीकृत डॉक्टर्स आहेत. त्यांची वैद्यकीय सेवा सुरू आहे. राज्यात शासकीय आणि खाजगी मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी नवीन १२,८२४ तयार होत आहेत. त्यामुळे यापुढील काळात बोगस डॉक्टरांची संख्या वाढणार नाही.
========

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular