Friday, May 1, 2026
HomeCrimeबालिंगा येथे दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; सुदैवाने जीवितहानी टळली

बालिंगा येथे दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; सुदैवाने जीवितहानी टळली

बालिंगे:

करवीर तालुक्यातील बालिंगा (ता. करवीर) येथे आज सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील (वय २७, रा. भामटे) हे दूध संघात दूध घालून टेम्पोने कोल्हापूर येथून कळंबे तर्फ कळे येथे जात होते. दरम्यान बालिंगा येथे टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाला आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. प्रसंगावधान राखत चालकाने टेम्पो मनुष्य गर्दी नसलेल्या दिशेने, झाडाकडे वळवण्याचा प्रयत्न केला.

मात्र भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला लावलेला विजेचा डिजिटल बोर्ड, तीन दुचाकी आणि विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो झाडावर जाऊन आदळला. या अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून दुचाकींचेही मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या दुचाकीधारकांमध्ये भाऊ सुतार, सुलतान शेख आणि अकबर शेख यांचा समावेश आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापूर–गगनबावडा मार्गावर दूध वाहतूक करणारे टेम्पो वेळेवर दूध पोहोचवण्यासाठी अनेकदा भरधाव वेगाने धावताना दिसतात. सकाळच्या वेळेत ही घाई अपघाताला निमंत्रण देत असल्याची नागरिकांतून चर्चा होत आहे. प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवून वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular