खुपिरे : मोगरबन अग्रो प्रोडक्ट प्रा.लिमिटेड, खुपिरे यांच्या वतीने दिनांक १ मार्च २०२६ रोजी कष्टकरी व गरीब होतकरू महिलांसाठी मोफत शेळीपालन / बकरीपालन / कुक्कुटपालन या विषयांवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विविध तालुक्यांतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कंपनीच्या व्यवस्थापिका अध्यक्षा सौ. योगिता बंडोपंत हराळे व श्री. बंडोपंत बाळू हराळे यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला. श्री. बंडोपंत हराळे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री श्रीमती आनंदी बाळू हराळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी फलटण (जि. सातारा) येथील श्री. कन्हया चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत करवीर, कागल, राधानगरी, पन्हाळा, शाहुवाडी तसेच पुणे जिल्ह्यातून एकूण ८७ महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी महिलांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यशाळेदरम्यान शेळीपालन व कुक्कुटपालन विषयांवरील पाच प्रकारची पुस्तके तसेच कोंबड्यांच्या खाद्य भांड्यांचे प्रत्येक महिलेला मोफत वितरण करण्यात आले. तसेच वेटरीना अॅनिमल प्रोडक्ट कंपनी यांच्या वतीने शेळी-मेंढ्यांसाठी आवश्यक प्राथमिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कागल तालुक्यातील बोरवडे येथील सौ. सुप्रिया उदय साठे यांनी शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायात विशेष प्रगती केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. शरद आयरे, खुपिरे ग्रामीण पशुवैद्यकीय दवाखाना (वर्ग १) यांचे प्रतिनिधी श्री. महेश पाटील तसेच श्री. योगेश हराळे, श्री. भगवान हराळे, श्री. संभाजी हराळे व राहुल वाळवेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रणव, श्रेयेश, किरण, प्रणिता, सानिका व साक्षी या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे श्री. बंडोपंत बाळू हराळे हे स्वतः दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही सामाजिक जाणिवेतून अशा नाविन्यपूर्ण व सेवाभावी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात.
सदर प्रशिक्षण कार्यशाळा पूर्णतः मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.