पन्हाळा प्रतिनिधी-
कोल्हापूर वरून पन्हाळ्याकडे निघालेल्या फॉक्स वॅगन कंपनीच्या j-2 एम. एच. 09GZ-7700 या भरधाव कारचा भीषण अपघात पन्हाळ्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये घडला.
वेगावर नियंत्रण सुटल्याने चालकाने कार वरील ताबा गमावला आणि वाहन थेट चव्हाण यांच्या घराजवळील बी. एस. एन. एलच्या खांबावर आदळले. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की गाडीच्या धडकेने बी.एस.एन.एलचा खांब तब्बल तीस फूट उडून लांब पडला. या भीषण अपघातामध्ये चालक सोनिक विधाने वय वर्ष 24 राहणार गांधीनगर कोल्हापूर व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर कोल्हापुर येथील विंन्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पन्हाळा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच, पन्हाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे .पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिताराम डोईफोडे अधिक तपास करीत आहेत. यावेळी आपटी बुधवार पेठ गावचे पोलीस पाटील रघुनाथ बुचडे उपस्थित होते. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वेगाच्या धोक्याची प्रचिती पाहायला मिळत आहे.