Saturday, April 18, 2026
HomeEducationछत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महिलादिन विविध उपक्रमांनी संपन्न

छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महिलादिन विविध उपक्रमांनी संपन्न

पन्हाळा : येथील संजीवन शिक्षण समूहाच्या छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये व्याख्यान आणि नारी सन्मान अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला दिन साजरा केला.
या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ आणि छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी पालक
डॉ. माधवी लोकरे होत्या.
सोहळ्याचा आरंभ सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलाने झाला. स्वागत, प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाच्या प्राचार्या शिल्पा पाटील-सांगावकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात शिल्पा मॅडम यांनी मनुस्मृतीमधील यत्र नार्यस्तु पज्यन्ते रमन्ते तत्र देवता: हा श्लोक उद्रृत केला आणि समाजातील स्त्री पुरुष असमानतेचा भेद संपून दोहोंमध्ये समता साकार होणे २१ व्या शतकाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.
त्या नंतर श्रेया पाटील आणि संस्कृती खोत या विद्यार्थिनींनी आपल्या वक्तृत्वातून महिला दिनाचे महत्त्व विशद केले. त्या नंतर प्रतिभा निकम आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल राठोड यांनी आपल्या मनोगतातून स्त्री शक्तीचा जागर व्यक्त केला.
या सोहळ्या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या डॉ.माधवी लोकरे यांनी स्त्री अष्टशक्ती असते म्हणून 8 मार्च रोजी आणि स्त्री ही माता, भार्या आणि कन्या अशा 3 भूमिका पार पाडत असते म्हणून मार्च या तिसऱ्या महिन्यात महिला दिन साजरा केला जात असावा असे विचार मांडले आणि आठ मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क येथील महिलांनी संघटित होऊन काढलेला मोर्चा आणि केलेल्या मागण्या, पुढील काळात 08 मार्च 1975 रोजी युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिनाचा दिलेला सन्मान, अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला. समाजातील स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे तसेच स्त्रियांच्या प्रौढ वयामध्ये येणारा एकाकीपणा टाळण्याकरिता वाचन, संतुलित आहार आणि नित्य व्यायाम या कडे ही त्यांनी लक्ष द्यावे असे ही डॉ. लोकरे याप्रसंगी म्हणाल्या. सध्या एम. बी. बी. एस. करणारी माझी कन्या किमया हिला छत्रपती शिवाजी कॉलेजने घडवले या बद्दल डॉ. लोकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
त्या नंतर संजीवन शिक्षण समूहाचे सह-सचिव एन. आर. भोसले यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी बालरोग तज्ञ डॉ. शिवानी यांनी मनोगत व्यक्त करताना कॉलेजच्या काळातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय निश्चित करा जग काय म्हणते याचा विचार करू नका अशा विचारातून प्रेरणा दिली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये एन. आर. भोसले यांनी इतिहासातील क्रांतिकारकांना जेवण पुरवणाऱ्या आणि भूमिगत क्रांतिकारकांना आपल्या घरी आश्रय देणाऱ्या तथापि अनामिक राहिलेल्या महिलांचे ब्रिटिश सरकार विरुद्धचे साहस आपण आठवूया आणि त्यांना ही मनोमनी आदरांजली वाहूया असे विचार व्यक्त केले. आजच्या युगातील महिलांचे कर्तृत्व हे निर्विवाद आहे महिलांचा सन्मान करणे हॆ पुरुषांचे कर्तव्य आहे. माझी आई दुसरी पर्यंतच शिकली होती परंतु तिला बहिणाबाई सारख्या जात्यावरच्या ओव्या पाठ होत्या माझी आई अनुभवांचे चालते बोलते विद्यापीठ होते असे विचार भोसले यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या सोहळ्या प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. माधवी लोकरे, एन. आर. भोसले यांच्या सुविद्य पत्नी वर्षा भोसले, डॉ.शिवानी भोसले, प्राचार्या शिल्पा पाटील- सांगावकर या कर्तृत्वशाली महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रतिभा निकम, जयश्री चांदणे, प्रविजा निकम, प्रियांका कुंभार, वर्षा येरुडकर, ग्रंथपालिका शुभांगी गुजर, उज्वला पाटील आणि कर्मचारी प्रभावती कदम यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या सोहळ्या प्रसंगी छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्याला संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी.आर. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular