कोल्हापूर: मोहन कांबळे प्रतिनिधी.
महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर (जरगनगर) येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यशाचा नवा इतिहास रचला आहे. इयत्ता चौथी, पाचवी आणि सातवीच्या तब्बल १३४ विद्यार्थ्यांनी मिळून १४ लाख ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती खेचून आणली. या अभूतपूर्व यशाचे औचित्य साधून रविवारी रामानंद नगर ते शाळा परिसरादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य गौरव मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
मिरवणुकीचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण समितीच्या नूतन शिक्षण सभापती शीला सोनुले, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, प्रशासन अधिकारी जयश्री जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जरग आणि वैभवी जरग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
हलगीचा कडकडाट नि लेझीमचा ताल
रामानंद नगर येथून निघालेली ही मिरवणूक संपूर्ण परिसरासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. प्रसिद्ध हलगीवादक रणवीर आवळे यांच्या हलगी-घुमक्याच्या नादाने आणि विद्यार्थ्यांच्या लेझीमच्या ठेक्याने संपूर्ण जरगनगरी दुमदुमून गेली. मुख्य मार्गावर नागरिकांनी गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली. इयत्ता ४ थी, ५ वी आणि ७ वीतील राज्य व जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी तसेच त्यांना वर्षभर मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना फेटा बांधून विशेष सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान
या यशामागे इयत्ता ४ थीच्या टीममधील बी. आर. पिंपळकर, सुभाष मराठे, तानाजी दराडे, संतोष मोरमारे, नंदकुमार पाटील, मेघा सावंत, किरण माळी, मनिषा रेडेकर, ललिता आढाव; ५ वीच्या टीममधील वर्षा पाटील, सुजाता दाभोळकर, ज्योती उबाळे, दिग्विजय नाईक, पल्लवी देसाई, सुरेश केरुरे, सहदेव कांबळे, सुवर्णा पाटील; तसेच ७ वीच्या टीममधील सुवर्णा सोनाळकर, सुजाता पोळ, अजित कानकेकर, वंदिता महाडिक, प्राजक्ता भंडगे आणि पृथ्वीराज आडनाईक या शिक्षकांचे मोलाचे परिश्रम लाभले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास नगरसेविका डॉ. सुषमा जरग, दुर्वास कदम, मानसी लोळगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाटील, पर्यवेक्षक विजय माळी, शिष्यवृत्ती विभागप्रमुख संजय शिंदे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, राजेंद्र आपुगडे, राहुल चिकोडे, सुनील पाटील, विमल गवळी, बाळासाहेब काळे, मुख्याध्यापिका नीता ठोंबरे, ज्येष्ठ शिक्षक शिवाजी पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे अहोरात्र मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा या त्रिवेणी संगमामुळेच मनपा शाळेने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे,” अशा शब्दांत मान्यवरांनी गुणवंतांचे कौतुक केले.