Sunday, April 19, 2026
HomePoliticalकरवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दिपाली पाटील...

करवीर पंचायत समितीवर पहिल्यांदाच महायुतीचा झेंडा; सभापती साताप्पा पाटील, उपसभापती दिपाली पाटील बिनविरोध

कोल्हापूर, १० मार्च |
करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महायुतीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकावला आहे. तब्बल ६५ वर्षे कायम असलेल्या काँग्रेसच्या सत्तेला धक्का देत महायुतीने पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले. आज झालेल्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताप्पा धोंडीराम पाटील यांची सभापतीपदी, तर भाजपच्या दिपाली संजय पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने २४ पैकी १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसने ७, भाजपने ६ आणि शिवसेनेने ३ जागा जिंकल्या होत्या.

सभापती पदासाठी साताप्पा पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्याचप्रमाणे उपसभापती पदासाठी दिपाली पाटील यांचाही एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकाऱ्यांनी दोघांचीही निवड बिनविरोध घोषित केली.

साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून विजयी झाले आहेत, तर दिपाली पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून निवडून आल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये आमदार अमल महाडिक यांनी महायुतीत समन्वयाची भूमिका निभावत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापती पदावर भाजपला संधी मिळाली आहे.

या निवडीमुळे करवीर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular