नाशिक : स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील खरा ‘मास्टरमाईंड’ म्हणून त्याचाच निकटवर्तीय ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, नीरज जाधव यानेच डिसेंबर २०२५ मध्ये खरातच्या कार्यालयातील तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतले. या व्हिडिओंच्या आधारे त्याने खरातला ब्लॅकमेल करण्याचा कट रचल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, खरात महिलांचे शोषण करत असल्याची माहिती नीरजला मिळाली होती. त्यानंतर त्याने काही साथीदारांच्या मदतीने खरातकडून सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, खरातने त्याला प्रतिसाद न दिल्याने नीरजने थेट पीडित महिलांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहित महिलेला मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकी देण्यात आली. मात्र, तिने धैर्य दाखवत ही बाब खरातला सांगितली. खरातने या प्रकरणापासून दूर राहत तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.
यानंतर नीरजने दुसरा डाव खेळत नाशिकमधीलच एका २८ वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. या घटनेनंतर प्रकरण गंभीर बनले आणि संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. याच तक्रारीमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
दरम्यान, पोलिसांनी खरातच्या ताब्यातून ५८ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केल्याचा दावा केला आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर खरातला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावरही टीका होत असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच खरातचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे आरोप होत असल्याने प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.
पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकून पिस्तूल आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.