शिये : “परमेश्वराची करणी नारळात पाणी” असे म्हणतात, त्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी ता. करवीर येथे एक अनोखी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथील शेतकरी लक्ष्मण शामराव पाटील यांच्या शेतातील बोअरवेलमधून कोणतीही इलेक्ट्रिक मोटार न वापरता पाणी सतत बाहेर येत असल्याने परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
लक्ष्मण पाटील यांनी आपल्या शेतात विंधन विहीर (बोअरवेल) घेतली. सुरुवातीला पाणी न लागल्यामुळे त्यांनी सुमारे ६०० फूट खोलपर्यंत खोदकाम केले. अखेरीस पाणी लागले, मात्र नेहमीप्रमाणे मोटारद्वारे पाणी उपसा करण्याऐवजी या बोअरवेलमधून आपोआपच पाणी बाहेर येऊ लागले.
विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशीही या बोअरवेलमधून अंदाजे अडीच ते तीन इंच वेगाने पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. या अनोख्या घटनेची बातमी पंचक्रोशीत पसरताच नागरिकांनी प्रत्यक्ष पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील दाबामुळे (आर्टेशियन वॉटर प्रेशर) अशा प्रकारे पाणी आपोआप वर येऊ शकते. मात्र, स्थानिकांसाठी हा प्रकार निसर्गाची एक विलक्षण देणगी ठरत आहे.
या घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण असून, शेतकऱ्यांसाठी ही घटना दिलासादायक ठरत आहे.