Thursday, April 16, 2026
HomePoliticalकोल्हापूर : ‘गोकुळ’ची चौकशी सुरू; निवडणुकीपूर्वीच पेच वाढला

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची चौकशी सुरू; निवडणुकीपूर्वीच पेच वाढला

कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथील सभासद संस्थांच्या चौकशीला आजपासून अधिकृत सुरुवात झाली आहे. सांगली येथील सहायक निबंधक (दुग्ध) दीपा खांडेकर आणि लेखापरीक्षक ए. एस. पैलवान यांच्या समितीने शिरगाव येथील मुख्य प्रकल्प कार्यालयात दिवसभर ठाण मांडून प्राथमिक माहिती संकलित केली.

विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांच्या मागणीनुसार या चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. गेल्या तीन दिवसांच्या सुटीनंतर चौकशी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपास प्रक्रिया सुरू केली. यावेळी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आवश्यक माहिती देत पूर्ण सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनीही अधिकाऱ्यांची भेट घेत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या. “चौकशीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे व माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी,” असे त्यांनी निर्देशित केले. गोकुळ प्रशासनाकडून तपासासाठी पूर्ण सहकार्य दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

चौकशीदरम्यान आवश्यक कागदपत्रांची छाननी करून अंतिम अहवाल विभागीय उपनिबंधकांकडे सादर केला जाणार आहे. यामुळे सध्या गोकुळची निवडणूक वेळेत होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१२०० संस्थांचा पेच; निवडणुकीपूर्वी निर्णयाची मागणी

गोकुळ संघाच्या निवडणुकीपूर्वीच सुमारे १२०० सभासद संस्थांच्या पात्रता-अपात्रतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भातील सर्व याचिका एकत्रित करून बुधवारी (ता. ८) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी होणार आहे.

तामगाव येथील सद्गुरू दूध संस्थेच्या अध्यक्षांनी “संस्थांच्या पात्रतेवर निर्णय झाल्यानंतरच निवडणूक घ्यावी,” अशी मागणी केली आहे. याशिवाय श्री हनुमान दूध संस्था व स्वामी समर्थ दूध संस्थांनीही याचिका दाखल केल्या आहेत.

तसेच, गतवर्षी संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महादेव दूध संस्थेच्या संचालकांनी मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे.

एकूणच, चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संघाची आगामी निवडणूक अधिकच अनिश्चिततेत सापडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular