कोल्हापूर (प्रतिनिधी) : महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना”च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करवीर मतदारसंघात क्षेत्रस्तरीय समिती सक्रिय झाली असून, या समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज सर्किट हाऊस येथे पार पडली.
विधानसभा सदस्य आमदार चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, तसेच वन व बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार नरके यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणंद रस्त्यांचे आराखडे तयार करून ते गाव नकाशावर स्पष्टपणे दर्शविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, शासकीय जागेवरील पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांची अचूक हद्द व सीमा निश्चित करून तात्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले.
पाणंद रस्त्यांचे एकेरी, दुहेरी व डबल लाईन अशा प्रकारात वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन करण्यावर भर देण्यात आला. विशेषतः एका गावातून दुसऱ्या गावाला जोडणारे आणि गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते प्राधान्याने खुली करण्याचे निर्देश देण्यात आले.
यासोबतच, २५ किलोमीटरचा क्लस्टर तयार करून त्यानुसार ठेकेदार निश्चित करण्याची कार्यपद्धती ठरविण्यात आली. अतिक्रमणमुक्त झालेल्या पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण शासनाच्या विहित निकषांनुसार करण्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी CSR निधीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र खाते सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी, संबंधित सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांनुसार तात्काळ कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार नरके यांनी दिले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यास सुलभता मिळून शेतीच्या कामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सदर आढावा बैठकीस श्रीमती मोसमी चौगुले , मा.उपविभागीय अधिकारी करवीर, शउपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग प्रतिनिधी , उपविभागीय अधिकारी, श्री स्वप्निल पवार तहसिलदार करवीर, श्रीमती रुपाली सूर्यवंशी तहसिलदार गगनबावडा, श्रीमती माधवी शिंदे तहसिलदार पन्हाळा तसेच श्रीमती सययद आलमास गटविकास अधिकारी गगनबावडा, श्रीमती सोनाली माडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा, श्री किरण माने उपअधिक्षक भूमी अभिलेख करवीर, पन्हाळा , गगनबावडा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर, गगनबावडा, पन्हाळा उपअभियंता (बांधकाम) जि. प करवीर गगनबावडा, पन्हाळा उपअभियंता (बांधकाम) सा.पा उपविभाग करवीर, गगनबावडा पन्हाळा इत्यादी अधिकारी उपस्थित होते.