पन्हाळा प्रतिनिधी –
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ५ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास गडावरी येथील एका रुग्णाला चक्कर आल्याने त्याला तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या वेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर शिवाजी टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना व्यवस्थित बोलता किंवा चालताही येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या परिस्थितीत नर्सिंग स्टाफने रुग्णावर प्राथमिक उपचार केले. मात्र, पुढील उपचारासाठी रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे कोल्हापूर येथे हलविण्यात आले. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडिओ चित्रीत केला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली.
या घटनेची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक, कोल्हापूर यांनी अहवाल सादर केला. तसेच, आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य उपसंचालक डॉ.दिलीप माने यांनी तात्काळ प्रशासकीय कारवाई केली आहे. आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्याच्या वर्तणुकीमुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार, पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. टोणपे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, पन्हाळा परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, “रुग्णांचा जीव अशा मद्यधुंद अधिकाऱ्यांच्या हवाली करायचा का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.