Friday, April 17, 2026
HomeCrimeभुयेवाडी (ता. करवीर) येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्ला; मेंढपाळांचे मोठे नुकसान

भुयेवाडी (ता. करवीर) येथे सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्ला; मेंढपाळांचे मोठे नुकसान

भुयेवाडी:

भुयेवाडी (ता. करवीर) परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, दि. 12 रोजी रात्री घडलेल्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने शेतकरी व मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

डोंगराकडील यशवंत पाटील यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसवण्यासाठी आलेले मेंढपाळ रघुनाथ पांडुरंग हजारे हे आपल्या कळपासह वास्तव्यास होते. रात्री अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज सुरू झाल्यानंतर बिबट्याने कळपावर हल्ला करत एक शेळी ठार केली. त्यानंतर दुसऱ्या शेळीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, घाबरलेल्या मेंढ्या, शेळ्या व बोकडांनी पळ काढला. हल्ल्यानंतर बिबट्या डोंगर कपारीत निघून गेला. या घटनेमुळे रघुनाथ हजारे यांनी रात्रभर भीतीच्या छायेखाली काढली.

सकाळी ही माहिती कृष्णात हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिकांशी चर्चा करून वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून परतले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी पांडुरंग सिंग आप्पा हजारे यांच्या मेंढपाळाच्या कळपावरही बिबट्याने हल्ला केला. भुयेवाडी येथील डोंगराकडील ओढ्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये मेंढ्या बसवलेल्या असताना, बिबट्याने एक मेंढी ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली.

या सलग हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतवस्त्यांवर जाण्यास नागरिक धजावत नाहीत. बिबट्या, रानडुकरे व इतर वन्य प्राण्यांचा वाढता वावर हा चिंतेचा विषय ठरत आहे.

या घटनांमध्ये संबंधित मेंढपाळांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बाधितांना तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular