दानोळी : येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) यांचे अपहरण करून त्यानंतर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १३) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी भरतेश यांचे अपहरण केले. अपहरणानंतर त्यांच्या मोबाईलवरूनच चुलत भावाला फोन करून २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दिली. मात्र सुरुवातीला ‘मिसिंग’ची नोंद घेऊन पुढील कारवाई उद्या पाहू, असे सांगण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांच्यासह स्वतः शोध मोहीम सुरू केली. शोधादरम्यान शेरीमळा रस्त्यावर उसाच्या शेतात भरतेश यांची गाडी व चप्पल आढळून आली. त्याच ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीचा मफलर आणि नाईट बूटही सापडले. घटनास्थळी झटापट झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
मंगळवारी (दि. १४) दुपारी सुमारे बारा वाजता त्या ठिकाणापासून अवघ्या १०० फूट अंतरावर भरतेश यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या ओठांवर व तोंडावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, डीवायएसपी ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.