Wednesday, April 15, 2026
HomeCrimeफक्त दोन गुणांनी पोलीस भरती हुकली; तरुणीचा टोकाचा निर्णय, नाशिक हादरले

फक्त दोन गुणांनी पोलीस भरती हुकली; तरुणीचा टोकाचा निर्णय, नाशिक हादरले

नाशिक : पोलीस भरतीत केवळ दोन गुणांनी अपयश आल्याच्या नैराश्यातून एका तरुणीने आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे घडली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा ही पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवून सातत्याने मेहनत घेत होती. अलीकडेच जाहीर झालेल्या भरती निकालात तिला १२५ गुण मिळाले, तर कटऑफ १२७ गुणांवर गेला. केवळ दोन गुणांनी संधी हुकल्याने ती मानसिक तणावाखाली गेल्याचे सांगितले जाते.

शनिवारी सकाळी सुमारास तिने आपल्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती योगेश्वर विष्णू सुरुडे यांनी पोलिसांना दिली.

घटनेनंतर घोटी पोलीस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रतीक्षा ही अत्यंत जिद्दी व मेहनती स्वभावाची होती. स्वतःच्या कष्टावर पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, अपयशाचा धक्का ती सहन करू शकली नाही.

दरम्यान, या घटनेने स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत वाढता ताण पुन्हा एकदा समोर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, अपयश हे आयुष्याचा शेवट नसून, अशा वेळी कुटुंबीय, मित्र आणि मार्गदर्शकांशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular