(कोल्हापूर )अभिजीत बोरगे : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत राज्य शासनाने सुधारित आराखड्याला मंजुरी देत संबंधित अधिसूचना (जीआर) जारी केल्याने प्रकल्पाला वेग आला आहे. या जीआरनुसार महामार्गाच्या नव्या मार्गरेषेत अनेक गावांचा समावेश होत असून भूसंपादन प्रक्रियाही गतीमान होणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग हा सुमारे ८५० किमी लांबीचा असून विदर्भ ते कोकण असा राज्याला जोडणारा महत्त्वाचा द्रुतगती मार्ग ठरणार आहे. या महामार्गामुळे वर्धा ते सिंधुदुर्ग दरम्यान १३ जिल्हे आणि सुमारे ४० तालुके जोडले जाणार आहेत.
नव्या सुधारित आराखड्यानुसार नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील मार्गात बदल करण्यात आला असून सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
महामार्गाचा उद्देश राज्यातील प्रमुख शक्तिपीठे आणि धार्मिक स्थळांना जोडणे हा असून या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
दरम्यान, प्रस्तावित मार्गामुळे अनेक गावांवर भूसंपादनाचा परिणाम होण्याची शक्यता असून काही भागात शेतकऱ्यांकडून विरोधही होत आहे. विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि इतर पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये जमीन जाण्याच्या भीतीमुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
सरकारकडून मात्र संबंधित गावांची अंतिम यादी व तपशीलवार शासन निर्णय जाहीर झाला आहे.
त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील गावे पुढीलप्रमाणे:
हातकणंगले : पारगाव,
पन्हाळा :बहिरेवाडी, जाखले,गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशीरे तर्फ ठाणे
करवीर :केर्ली, केर्ले, वरणगे, पाडळी बुद्रुक, शिंदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडीत्रे, बहिरेश्वर, कसबा बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सडोली दुमाला, हिरवडे दुमाला, भाटणवाडी, सोनाळी, हसूर दुमाला,
राधानगरी : राशिवडे बुद्रुक, कोदवडे,वाघवडे, मोहडे, चाफोडी तर्फ तारळे,कौलव, पिंपळ वाडी, ठिपकुर्ली, कुऱ्हाड वाडी, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर,मालवे