Monday, May 4, 2026
HomePoliticalकरवीरमध्ये प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्गा’ला वाढता विरोध; आमदार नरके यांची फेरविचाराची मागणी

करवीरमध्ये प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्गा’ला वाढता विरोध; आमदार नरके यांची फेरविचाराची मागणी

कोल्हापूर : करवीर मतदारसंघातून प्रस्तावित नागपूर–गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पाला स्थानिक पातळीवर तीव्र विरोध वाढत असून, आमदार चंद्रदीप नरके यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे फेरविचाराची मागणी केली आहे.

२८ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नरके यांनी सविस्तर निवेदन सादर केले. या वेळी त्यांनी करवीर तालुक्यातील शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध शासनापर्यंत पोहोचवला.

प्रस्तावित महामार्ग करवीर मतदारसंघातील केर्ली, पाडळी बुद्रुक, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला अशा १८ गावांमधून जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात सुपीक शेतीजमिनींचे अधिग्रहण होण्याची शक्यता आहे.

या भागातील शेती ऊस, भाजीपाला, भात, सोयाबीन आणि केळी यांसारख्या नगदी पिकांवर आधारित असून, महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. लहान तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनींमुळे शेती करणे कठीण होईल आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

याशिवाय, या प्रकल्पामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा यांसारख्या नद्यांच्या पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होऊन भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांच्या पूरप्रवणतेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा संवेदनशील असल्याचे नरके यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, करवीर तालुक्यातील अनेक ग्रामसभांनी या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केले असून, शेतकरी आणि नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ विकासाचा नसून जनभावनेशी निगडित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नरके यांनी विद्यमान राष्ट्रीय महामार्ग आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना नवीन समांतर महामार्गाची आवश्यकता नसल्याचे सांगत हा प्रकल्प करवीर मतदारसंघाऐवजी अन्य मार्गाने वळवण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत शेतकरी आणि स्थानिकांच्या हिताचा विचार करून प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार या प्रकल्पात बदल करणार का, याकडे करवीरमधील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular