Monday, May 4, 2026
HomePoliticalकोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री व पंचगंगा प्रदूषणाविरोधात कठोर कारवाईची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री व पंचगंगा प्रदूषणाविरोधात कठोर कारवाईची मागणी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दि. ४
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या राजरोसपणे सुरू असलेली अमली पदार्थांची विक्री, त्यामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जात असलेली तरुण पिढी आणि पंचगंगा नदीचे गंभीर होत चाललेले प्रदूषणाबाबत कठोर कार्यवाही होण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात गांजा, ड्रग्ज आणि घातक रासायनिक पदार्थांची विक्री वाढली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही या टोळ्या सक्रिय असून, शालेय व महाविद्यालयीन मुले या जाळ्यात अडकत आहेत. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तरुण पिढीला यातून बाहेर काढणे हे आवाहन निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
त्याबरोबरच पंचगंगा नदीचे प्रदूषण ही जिल्ह्याची जीवनवाहिनी धोक्यात आणणारी बाब ठरली आहे. सांडपाणी आणि औद्योगिक रसायने थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याचे आरोग्य बिघडले आहे.तातडीची उपाययोजना म्हणून शिरोळ व हातकंणगले तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्व गावातील ग्रामस्थांचे २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा उतरविण्यात यावा. दोन्ही तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अपु-या पाणीयोजना तातडीने पुर्ण कराव्या , शेतकऱ्यांना शेतीस दुषित व गटारीचे पाणी पुरवठा होत असल्याने उपसा सिंचन कर रद्द करावा , महापालिका व औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्लॅन्ट निधीअभावी रखडले असून ते तातडीने पुर्ण करावे , महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन योजनेतून पंचगंगा शुध्दीकरणास ३ हजार कोटींचा निधी देण्यात यावा या महत्वपूर्ण मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पालकमंत्र्यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हापोलिसप्रमुख यांना दिले त्याबरोबरच राज्य सरकारकडून शासन स्तरावरील पाठपुरावा करून पंचगंगा प्रदूषणाच्या मुद्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , सचिन शिंदे , बंडू पाटील , विशाल चौगुले , तानाजी वठारे , राजगोंडा पाटील , नितीन टारे , रमेश माने , सचिन सुर्यवंशी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular