कोल्हापूर:
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात वाढलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्थेविरोधात विरोधी पक्षनेत्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत तातडीने बदल करण्याची मागणी केली.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांना हे निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक सचिन हरीश चौगले, सचिन शेंडे, तसेच माजी नगरसेवक अजित पोवार धामोडकर, नगरसेविका दिपाली घाटगे, संदीप बिरांजे आदी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सध्या कडक उन्हाळ्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी गैरसोय होत आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सुचवले की, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करून शहरात दररोज पाणीपुरवठा सुरू करावा. आवश्यक असल्यास पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी करावा, मात्र तो नियमित आणि सर्व प्रभागांमध्ये समान पद्धतीने करावा.
यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, दरेकर मॅडम तसेच पाणीपुरवठा विभागाचे सर्व शाखा अभियंते उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील नागरिकांमधूनही सध्याच्या पाणीपुरवठा पद्धतीविरोधात नाराजी व्यक्त होत असून महापालिका प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.