Wednesday, May 6, 2026
HomeAdministrationकोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी जाहीर

कोल्हापूर पाटबंधारे विभागाकडून उपसाबंदी जाहीर

कोल्हापूर, दि. 5 मे २०२६ — कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी रब्बी हंगाम २०२६-२७ साठी पंचगंगा व भोगावती नदी परिसरात शेतीसाठी पाणी उपसा करण्यावर तात्पुरती बंदी (उपसाबंदी) जाहीर केली आहे. कार्यकारी अभियंता श्रीमती स्मिता चेतन माने यांनी हा आदेश जारी केला आहे.

पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित उपविभागांकडून प्राप्त अहवालांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

भोगावती नदी परिसरातील उपसाबंदी :
राधानगरी धरणापासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत तसेच कासारी व कुंभी नदीच्या निर्दिष्ट भागांमध्ये ७ मे ते ८ मे २०२६ या दोन दिवसांच्या कालावधीत उपसाबंदी लागू राहणार आहे.

पंचगंगा नदी परिसरातील उपसाबंदी :
शिंगणापूर ते रुई बंधाऱ्यादरम्यानच्या दोन्ही तीरांवर ९ मे ते १० मे २०२६ या कालावधीत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.

या कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पाणी उपसा आढळल्यास संबंधित यंत्रणा जप्त करण्यात येईल आणि परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच, या काळात होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही.

हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ५१(३) व ९७ अन्वये जारी करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular