Friday, May 8, 2026
HomePoliticalगोकुळच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय समीकरणांची चाहूल; बंटी पाटील–महाडिक एकत्र येण्याच्या हालचाली?

गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय समीकरणांची चाहूल; बंटी पाटील–महाडिक एकत्र येण्याच्या हालचाली?

कोल्हापूर (संपादकीय): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीला आता मोठी राजकीय पार्श्वभूमी मिळू लागली आहे. न्यायालयाने गोकुळची निवडणूक प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पातळ्यांवर युती आणि नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणातील कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि महाडिक गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या हालचाली सध्या पडद्यामागे सुरू असल्या तरी अलीकडील काही घडामोडींमुळे त्याबाबतचे संकेत स्पष्टपणे मिळत असल्याचे बोलले जात आहे.

आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे बंधू संजय पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांची घेतलेली गुप्त भेट, तसेच विकासकामांसाठी एकत्र येण्याबाबत आमदार अमल महाडिक यांनी केलेले वक्तव्य यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. राजकारणात कायमस्वरूपी शत्रू नसतो, तर परिस्थितीनुसार समीकरणे बदलत असतात, याचीच प्रचिती या घडामोडींमधून येत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विविध स्तरांवर रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. भाजपकडून आगामी स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून ही व्यूहरचना केली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजे समरजितसिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश हाही त्याच व्यापक रणनीतीचा भाग मानला जात आहे.

गोकुळची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता आगामी जिल्हा राजकारणाची दिशा ठरवणारी असणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गोकुळवर प्रशासक नियुक्ती व चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर केलेले राजकीय वार हा भाजपच्या राजकीय रणनितीचा एक भाग आहे. गोकुळवर वर्चस्व ठेवणे हा भाजपच्या मुख्य उद्देश आहे. तसेच मंत्री मुश्रीफ यांचा वाढता राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी देखील ही रणनीती भाजपची असू शकते .विशेषतः महाडिक गट आणि बंटी पाटील एकत्र आल्यास  कोल्हापूरच्या राजकारणात मोठा राजकीय “बाँब” फुटू शकतो, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular