कोल्हापूर:
गोकुळ दूध संघच्या मुंबई व पुणे येथील पॅकिंग आणि वितरण व्यवस्थेशी संबंधित ठेकेदार कंपन्यांच्या व्यवहारांची सालनिहाय सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी संघाच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शुक्रवारी गोकुळच्या शिरगाव प्रकल्पस्थळी मुख्य प्रशासक आणि प्रशासकीय मंडळाला देण्यात आले.
सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक तसेच प्रशासकीय मंडळातील सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे आणि चंद्रकांत परुळेकर यांची भेट घेतली. यावेळी सह्यांसह निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात मुंबईतील पॅकिंग व वितरण व्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, पुण्यातील वितरण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या गोकुळ मिल्क सप्लायर्स तसेच पुण्यातील पॅकिंग ठेका असलेल्या गायत्री कोल्ड स्टोरेज या कंपन्यांची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रतिनिधींनी या कंपन्यांचे मालक कोण आहेत, संबंधित ठेके कधीपासून सुरू झाले, त्यांच्या कामासाठी किती रक्कम अदा करण्यात आली, याची सालनिहाय माहिती जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक यांनी, “दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कोणताही राजकीय दबाव न घेता कामकाज करण्यात येईल. सभासद संस्थांनी मागितलेली माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.
सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. गेल्या पाच वर्षांत गाई व म्हशीच्या दुधाला उच्चांकी दर मिळूनही प्रशासकीय अडचणी निर्माण होणे हे शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वीच्या संचालक मंडळांनी सत्तेचा वापर काही मोजक्या घटकांसाठी केला, तर विद्यमान व्यवस्थेने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा कणा असल्याचे सांगत, संघामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाल्याचे प्रतिनिधींनी अधोरेखित केले. दर महिन्याच्या ३, १३ आणि २३ तारखेला मिळणारे दूध बिल हे शेतकऱ्यांसाठी हक्काचे आणि विश्वासार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य प्रशासक आणि प्रशासकीय मंडळाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.