प्रतिनिधी | पन्हाळा
ऐतिहासिक पन्हाळगडावरील हजरत पीर शहादुद्दीन खतावली दर्गा मशिदीवरील प्रस्तावित कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शनिवारी, ९ मे रोजी प्रशासनाकडून करण्यात येणारी तोडक कारवाई तात्पुरती थांबली असून, या निर्णयानंतर पन्हाळा परिसरात प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
साधोबा तलावालगत असलेली ही ऐतिहासिक मशीद सुमारे १५५७ च्या काळात बांधण्यात आल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी मुस्लिम बांधव नमाज पठण करतात, तर मोहरम काळात हिंदू-मुस्लिम भाविक एकत्र येऊन पिरपंजाना निरोप देण्याची परंपरा आहे.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांकडून मशिदीच्या काही भागाचे बांधकाम सरकारी जागेवर व बेकायदेशीर असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने जागेची मोजणी केली असता अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. मुस्लिम समाजाने काही अतिक्रमण स्वतःहून काढून प्रशासनाला सहकार्यही केले. मात्र, उर्वरित बांधकाम बेकायदेशीर असल्याचा मुद्दा प्रशासनाने कायम ठेवला.
या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी ७ मे रोजी दर्गा ट्रस्टला २४ तासांत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली होती. प्रशासनाने ९ मे रोजी कारवाईसाठी सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र, दर्गा ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सदर कारवाईला ७ जुलै २०२६ पर्यंत स्थगिती दिली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.
या प्रकरणावरून विविध सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पन्हाळगड परिसरात इतर अनेक बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे असताना केवळ एका समाजावर कारवाई होत असल्याचा आरोप भारतीय दलित महासंघाने केला आहे. प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय बहुजन महासंघानेही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पन्हाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या पाच दिवसांपासून तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आता टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहे. दरम्यान, पन्हाळगडावरील अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.