कोल्हापूर :
ठाणे येथे नुकत्याच पार पडलेल्या युवासेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत करवीर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी श्रेयस विष्णू पाटील (खुपीरेकर) यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
आगामी काळातील S.I.R. प्रक्रिया, मतदार यादी प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे तसेच युवासेना सदस्य नोंदणी अभियान अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके, युवासेना निरीक्षक विरेंद्र मंडलिक तसेच उपजिल्हाप्रमुख संजय पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
श्रेयस पाटील यांचा मोठा मित्रपरिवार असून ते सातत्याने सर्वसामान्यांच्या संपर्कात असतात. गेल्या दहा वर्षांपासून ते सामाजिक कार्य, विविध निवडणूक प्रक्रिया आणि जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी राहिले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे स्वागत केले जात आहे. येणाऱ्या काळात आमदार चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर विधानसभा मतदारसंघात युवासेनेची मजबूत युवा फौज उभी करणार असल्याचा विश्वास श्रेयस पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.