पन्हाळा प्रतिनिधी:
पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडळ गावात अवैधरीत्या दारू साठवून विक्री करणाऱ्या युवकावर पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल अमर शंकर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रजित सुनिल जाधव (वय 27, रा. यवलूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास पडळ गावातील डी शॉपीजवळ भिंतीच्या आडोशाला उघड्यावर विविध विदेशी मद्याच्या बाटल्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त केला.
या कारवाईत मॅकडॉल नं.1, डॉक्टर स्पेशल, इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, मस्टर डिलाईट, रोमॅनो क्लासिक ओडका, मॅजिक मोमेंट, ओल्ड मंक, बॅगपायपर, ब्ल्यू बर्ड जिन, गोवा जिन, डीएसपी ब्लॅक तसेच देशी दारू अशा विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मद्याची एकूण किंमत हजारो रुपयांमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पन्हाळा पोलीस करत आहेत.