कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी चौकातील ‘छत्रपती शिवाजी मार्केट’च्या नामफलकावरील चुकीची शब्दरचना अखेर दुरुस्त करण्यात आली आहे. कसबा बावडा प्रभाग क्रमांक १ मधील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन हरीश चौगले यांनी हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुराव्यासह उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दि. २० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक चौगले यांनी ‘छत्रपती’ या शब्दातील पहिल्या वेलांटीची चूक निदर्शनास आणून दिली. इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा योग्य उल्लेख व्हावा, यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली होती. सभागृहाने या मागणीला एकमताने मंजुरी दिली होती.
सभेनंतर अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवक चौगले यांनी पुन्हा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांना लेखी निवेदन देत पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर तब्बल २७ दिवसांनंतर महापालिका प्रशासनाने नामफलकातील चूक दुरुस्त करून ‘छत्रपती शिवाजी मार्केट’ हे नाव योग्य पद्धतीने प्रदर्शित केले.
याबाबत बोलताना नगरसेवक सचिन चौगले यांनी कसबा बावड्याचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच जनतेच्या भावना आणि शिवभक्तांचा सन्मान राखण्यासाठी हा प्रश्न ठामपणे मांडल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने योग्य वेळी दखल घेत दुरुस्ती केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सन्मान राखण्यासाठी केलेल्या या पाठपुराव्याचे शहरभरातून कौतुक होत आहे.