पन्हाळा प्रतिनिधी :
पन्हाळा येथील पन्हाळा विद्या मंदिर प्रशालेच्या सन 1973 च्या एस.एस.सी. (जुनी अकरावी) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 53 वर्षांनंतर स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत, भावनांचा ओलावा आणि मैत्रीचा जिव्हाळा अनुभवत हा अनोखा मेळावा संस्मरणीय ठरला.
दि. 18 मे 2026 रोजी पन्हाळा विद्या मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. अनेक जण उच्चशिक्षित होऊन शासकीय व अशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत, तर काहींनी उद्योग व्यवसायात आपली ओळख निर्माण केली आहे. उर्वरित मित्रपरिवार शेती व्यवसायात कार्यरत असून आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत.
सेवानिवृत्त अभियंता रंगराव गायकवाड आणि माजी सैनिक आनंद चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांतून हा मेळावा साकार झाला. तब्बल पाच दशकांनंतर भेटलेल्या मित्रांनी एकमेकांना ओळखताना, गळाभेट घेताना आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना भावनांना वाट मोकळी करून दिली. काळाच्या ओघात चेहऱ्यावरील सुरकुत्या, पांढरे केस, हातातील काठी आणि बदललेला पेहराव यामुळे अनेकांनी “तू कोण?” अशी विचारणा करत पुन्हा नव्याने मैत्री अनुभवली.
या मेळाव्याला वर्गातील एकमेव महिला मैत्रीण सौ. शांता पानारी यांनी उपस्थिती लावत विशेष आकर्षण ठरल्या. गेल्या 53 वर्षांतील आयुष्यातील अनुभव, संघर्ष, यश-अपयश आणि घडलेल्या घटनांची आठवण प्रत्येकाने सर्वांसमोर व्यक्त केली.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजयकुमार कवठेकर हे या भावनिक क्षणांचे साक्षीदार ठरले. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश रामचंद्र सरदेसाई यांनी आपल्या सेवाकाळातील महत्त्वपूर्ण अनुभव कथन करत न्यायदान प्रक्रियेतील काही ठळक घटनांवर प्रकाश टाकला.
मेळाव्याच्या शेवटी सहभोजनाचा आनंद घेण्यात आला तसेच ‘पन्हाळ्याचा रणसंग्राम’ या लघुपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन डॉ. चंद्रशेखर स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन सी.एस.जी. शिंदे आणि श्रीशंकर यमगेकर यांनी केले, तर व्यवस्थापनाची धुरा आबाजी मुडेकर यांनी सांभाळली. आभार प्रदर्शन आर.बी. मिरजकर यांनी केले.
तब्बल 53 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जुन्या आठवणींचा भावनिक ओलावा उपस्थितांच्या मनात कायमचा घर करून गेला.